Sunday, June 24, 2007

change

मी मोठ्या उत्साहाने ब्लॊग सुरू केला. पण तो update करणं काही जमत नाहीये. सध्या मन:स्थितीच अशी विचित्र आहे की काही लिहायचं म्हटलं तरी काही सुचत नाहीये. कितीतरी वेळेला मी काहीतरी लिहायचा प्रयत्न केला. पण दोनचार ओळींच्यापुढे सरकतच नाहीये गाडी. मी इतके सुंदर पिक्चर पाहिले, २-३ छानशी पुस्तकं पण वाचून झाली. त्यावर लिहावं म्हटलं तरी जमत नाहीये. कदाचित सध्या एकून जे विचित्र feeling आलं आहे आयुष्य वाया जात असल्याचं, त्याचाच एकूण परिणाम असावा हा.
तसं बघायला गेलं तर वरवर सगळं ठीकच आहे. म्हणजे तशी बरी नोकरी आहे. तिथे कामाचं tension नाहीये फारसं. मी वेळेवर घरी पोचते. नंतर मी काही करायचं म्हटलं तरी वेळ आहे. हाताशी गाडी आहे. मनात जे येईल ते लगेच करता येईल अशी परिस्थिती आहे. तरीही हा उदासपणा काही कमी होत नाही. आजी म्हणते ’सुख ठणकतं तुम्हाला’. खरंच असावं का तिचं म्हणणं? मला कळत नाहीये की सध्याच्या नोकरीत security आहे म्हणून आनंद मानावा की पगार वाढत नाही याचं दु:ख करत बसावं? टीम चांगली आहे म्हणून खूश व्हावं की onsite जायचा चान्स नही म्हणून त्रास करून घ्यावा? काम चांगलं आहे म्हणून आनंदाने करावं की नवीन काहीच शिकायला मिळत नाही म्हणून चिडचिड करावी?
म्ला वाटतं गेली तीन वर्षं एकाच जागी काम करून मला त्या जागेचा, माणसांचा कंटाळा आला आहे. एकूणच फार secured वातावरण मला मानवत नाही हे माझ्या लक्षात आलंय. आणि फार दिवस एकच एक करणं माझ्या स्वभावात नाही. शिवाय मला अधून मधून पूर्णपणे एकटं रहायला आवडतं तसं मला गेल्या २ वर्षात जमलेलं नाही. I think I need a change. A change to change my mental condition!!!

Friday, June 8, 2007

श्रीगणेशा!

माझ्या ब्लॉगवरचं हे पहिलंच पोस्ट. बरेच दिवस ब्लॉग सुरू करायचा असं ठरवत होते. पण आपण असं काय लिहिणार आणि ते वाचण्यात लोकांना रस असेल का असे प्रश्न सतावत होते. पण शेवटी माझ्या ब्लॉग सुरू करण्याच्या तीव्र इच्छेने ह्या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं. आणि मी माझा ब्लॉग सुरू केला. ब्लॉगला नाव काय द्यावं असा अजून एक गहन प्रश्न. मी ब्लॉगच्या नावाचा विचार करत माझ्या खोलीतल्या खिडकीपाशी बसले होते. टेबलावर कालच माझ्या मैत्रिणीने दिलेला बुके होता. सुंदर रंगांच्या जर्बेरा, गुलाब फुलांची अतिशय कलात्मक मांडणी केली होती. पण मला सर्वात जास्त आवडला तो निशिगंध. नुसत्या निशिगंधाचा गुच्छ नक्कीच बनवत नसेल कोणी. पण त्या बुकेमधे आपल्या अस्तित्त्वाने निशिगंधाने इतर फुलांचं सौंदर्य खुलवलं होतं. आणि त्या बुकेकडे न बघताही जाणवणारा खोलीभर भरून राहिलेला त्याचा सुगंध. त्याक्षणी त्या निशिगंधाने मल इअतकी भुरळ पाडली!लगेच ठरवून टाकलं, माझ्या ब्लॉगचं नाव - निशिगंध. कदाचित इतक्या सुरेख ब्लॉग्जमधे त्याचं अस्तित्त्व लक्षातही येणार नाही कोणाच्या. पण तरीही मला सुखावत रहाणारा - माझा निशिगंध!!!!